सोलापूर – महानगरपालिकेच्या मागील तीन सर्वसाधारण सभांमध्ये रस्ते, चौक, उद्याने व इतर सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणासाठी सुमारे ७० प्रस्ताव दाखल झाले असून, त्यापैकी सध्याच्या सभेसाठीही सुमारे ३० नवीन प्रस्ताव विचाराधीन आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणाबाबत स्पष्ट व सर्वमान्य धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना करण्यात आली आहे.
सार्वजनिक रस्ते, चौक, उद्याने व इतर नागरी मालमत्ता या संपूर्ण समाजाच्या मालकीच्या असल्याने अशा ठिकाणांना शक्यतो केवळ राष्ट्रपुरुष, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक, संत, महापुरुष आणि देश-समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचीच नावे देण्यात यावीत. यामुळे भावी पिढीला अशा महापुरुषांचे कार्य, विचार आणि इतिहास जाणून घेण्याची संधी मिळेल.
वैयक्तिक व्यक्तींच्या नावाने सार्वजनिक ठिकाणांचे नामकरण करण्यासाठी वारंवार प्रस्ताव सादर करणे, त्यावर प्रशासनाने प्रक्रिया राबविणे, पत्रव्यवहार करणे आणि सभागृहात चर्चा करणे यासाठी मनुष्यबळ, वेळ आणि सार्वजनिक निधी खर्च होतो. त्यामुळे अशा प्रस्तावांवर मर्यादा आणणे आवश्यक आहे.
ज्यांना आपल्या कुटुंबातील किंवा वैयक्तिक व्यक्तींच्या स्मरणार्थ कार्य करावयाचे असेल, त्यांनी स्वतःच्या खाजगी जागेत पुतळा उभारणे, कमान बांधणे, स्मृतिफलक लावणे किंवा इतर उपक्रम राबवावेत. मात्र सार्वजनिक रस्ते, चौक, मार्ग, उद्याने आणि इतर महापालिकेच्या मालकीच्या जागांवर वैयक्तिक व्यक्तींची नावे देण्याचे टाळावे.
त्यामुळे महानगरपालिकेने नामकरणाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करून केवळ महापुरुष, राष्ट्रहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नावांशी संबंधित प्रस्तावच सभागृहात मंजुरीसाठी ठेवावेत. इतर प्रस्ताव सभागृहात विचारार्थ न आणता सार्वजनिक निधीचा अनावश्यक खर्च टाळावा.
आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे मा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले जिल्हा कार्याध्यक्ष इशरद नागोरे दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष जैनुद्दीन नदाफ अरविंद शेळके गजानन शिंदे राहुल मेरू आदी उपस्थित होते

