सोलापूर – तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिरातील श्री मार्कंडेय मंदिराच्या पुनर्विकासासाठी तसेच मंदिराचा नामफलक व लाइव स्क्रीन लावण्यासाठी अखिल भारतीय पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र संघमच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया अशोक माने यांना मंदिराचा पुनर्विकास, नामफलक, महर्षी मार्कंडेयांचे महात्म्य व मंदिराचा इतिहास दर्शविणारी माहिती स्क्रीन तसेच लाइव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
महर्षी मार्कंडेय हे पद्मशाली समाजाचे प्रमुख ऋषी व आराध्य प्रेरणास्थान आहेत. आई तुळजाभवानी मातेच्या पावन मंदिर परिसरात असलेल्या श्री मार्कंडेय मंदिराचा योग्य विकास व्हावा, त्याची स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी आणि महर्षी मार्कंडेयांचे महात्म्य, कार्य व इतिहास देशभरातून येणाऱ्या भाविकांना समजावा, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश आहे.
माया माने यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मंदिराच्या पुनर्विकासासाठी तसेच माहिती स्क्रीन व लाइव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.
यावेळी अखिल भारतीय पद्मशाली संघम, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष यल्लादास गड्डम, प्रधान सचिव वासुदेव इप्पलपल्ली, उपाध्यक्ष राजमहेंद्र कमटम , सह प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत जिंदम, नरसिंग कोटा, सुनील परचांडे आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
महर्षी मार्कंडेयांचे महात्म्य आणि पद्मशाली समाजाचा गौरवशाली वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे.

