सोलापूर : सोलापूर शहरातील भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी (वय ९ वर्षे) या बालकाचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर रेबीजचा संसर्ग होऊन झालेला दुर्दैवी मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना असून संपूर्ण शहराला हादरवून सोडणारी आहे. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्यासमोर मोठे आर्थिक व मानसिक संकट उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर मध्यचे आमदार श्री. देवेंद्रजी कोठे तसेच सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी संबंधित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे.
यासंदर्भात आमदार श्री. देवेंद्रजी कोठे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना सविस्तर निवेदन सादर करून समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष आर्थिक मदत मंजूर करण्याची त्यांनी विनंती केली.
तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून संबंधित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर मदत मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
याच अनुषंगाने श्री. रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख (मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष) यांची भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली. समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, बालकाच्या वडिलांना असलेला कर्करोगाचा आजार आणि त्यामुळे निर्माण झालेली अत्यंत बिकट परिस्थिती लक्षात घेता या प्रकरणात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
समर्थ स्वामीच्या अकाली निधनामुळे कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून त्यांच्या वडिलांवर कर्करोगावरील उपचार सुरू आहेत. त्यामुळे या कुटुंबाला तातडीच्या आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. शासनाने मानवीय दृष्टिकोनातून या प्रकरणाचा संवेदनशीलतेने विचार करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून लवकरात लवकर आर्थिक मदत मंजूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी आमदार श्री. देवेंद्रजी कोठे व महापौर श्री. विनायक कोंड्याल यांनी सांगितले की, पालकमंत्री मा. श्री. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कुटुंबाला शासनाकडून न्याय व आवश्यक ती आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मंजूर होईपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
