सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे शिकवला जाणारा विधी शाखेचा अभ्यासक्रम मराठी भाषेतून शिकवण्यात यावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुंबई येथे केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या या मागणीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी देण्याबाबत आश्वासित केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार विधी शाखेच्या परीक्षातील प्रश्नांची उत्तरे मराठीतून देता यावीत, अशी मागणी दयानंद विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे केली होती. शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ पासून याप्रमाणे कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु अद्याप याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विधी शाखेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा मराठी माध्यमातून घेतल्या जातात. सोलापुरातील विद्यार्थ्यांसाठीही हा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विधीशाखेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा मराठी भाषेतून सुरू करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार देवेंद्र कोठे यांनी अत्यंत चांगली आणि विद्यार्थी हिताची मागणी केली असून या मागणीला लवकरच मंजुरी देण्यात येईल. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही संचालकांना केल्या.
या मागणीला मंजुरी देण्याच्या आश्वासनामुळे सोलापूर जिल्ह्यातील विधीशाखेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण होईल आणखी सुलभ
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विधी शाखेचा अभ्यासक्रम मराठी भाषेत शिकवण्यास शासनाने मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण आता अधिक सुलभ होणार आहे. याबद्दल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार.
—– देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य