नेतृत्व हे केवळ पदाने मिळत नाही, तर ते कर्तृत्वाने आणि जनतेच्या अथांग विश्वासाने कमवावे लागते. सोलापूरच्या राजकीय क्षितिजावर आपल्या अभ्यासू, आक्रमक आणि तितक्याच संयमी कार्यपद्धतीने अवघ्या काही काळातच लोकप्रियतेचे शिखर गाठणारे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार श्री. देवेंद्र (दादा) राजेश कोठे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या ऐतिहासिक कारकिर्दीचा घेतलेला हा गौरवशाली आढावा.

संघ-भाजपचे संस्कार आणि कमी वयात आमदारकीची संधी
देवेंद्र दादांना अत्यंत कमी वयात आमदारकीची संधी मिळाली. ही संधी त्यांना केवळ राजकीय वारशामुळे मिळाली नाही, तर संघटन कौशल्य पूर्णपणे समजून घेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रनिष्ठ संस्कारात त्यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर मिळाली आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत त्यांनी संघटन मजबूत केले आणि आज ते सोलापूर भाजपचा सर्वात विश्वासू आणि खंदा चेहरा म्हणून पुढे आले आहेत.

कामगारांच्या चाळींचा १०० वर्षांपासूनचा प्रलंबित ‘B2’ चा प्रश्न मार्गी
सोलापूर ही गिरणगावाची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. येथील कामगारांच्या चाळींचा गेल्या १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला ‘B2’ चा जटिल प्रश्न आजवर कोणालाही सोडवता आला नव्हता. पिढ्यानपिढ्या कामगार कुटुंबे या हक्कापासून वंचित होती. पण देवेंद्र दादांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून शासन पातळीवर अत्यंत प्रभावीपणे बाजू मांडली आणि हा शंभर वर्षांचा जुना विषय कायमचा मार्गी लावला. दादांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आज हजारो कामगार कुटुंबांना त्यांचा हक्क मिळाला असून त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विमानतळाचा ऐतिहासिक प्रश्न सुटला
सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विरोधकांनी आजवर केवळ राजकारण केले. सोलापूरहून कधीच विमानसेवा सुरू होणार नाही असे म्हणत सातत्याने जनतेची दिशाभूल करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र दादांनी आपल्या कृतीतून चपराक दिली आहे. दादांनी या गंभीर प्रश्नावर सातत्याने दिल्ली ते मुंबई असा जोरदार पाठपुराव केला. सोलापूरचे कार्यक्षम पालकमंत्री जयकुमार गोरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करून सोलापूरची विमानसेवा यशस्वीपणे सुरू करून दाखवली.

उड्डाणपूल आणि आयटी पार्कचा यशस्वी तगादा
२०१६ साली ज्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते, तो प्रकल्प इतकी वर्षे रखडल्यामुळे खुद्द केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा विषय हाताळताना दादांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सातत्याने तगादा लावला, विशेष बैठका घडवून आणल्या आणि अखेर हा रखडलेला उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावला. यासोबतच, सोलापूरच्या तरुण पिढीला स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘आयटी पार्क’ चा विषयही दादांनी यशस्वीपणे मार्गी लावला असून, सोलापूरच्या औद्योगिकीकरणाला मोठी गती दिली आहे.

सोलापूर मनपातील ऐतिहासिक विजय
सोलापूर महानगरपालिकेत पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात देवेंद्र दादांचा वाटा अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण राहिला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवताना दादांनी संपूर्ण व्यूहरचना सांभाळली. खुद्द पालकमंत्र्यांनी जाहीर सभांमधून अनेकवेळा याचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे की, इतक्या कमी वयात सोलापूरच्या संपूर्ण राजकारणाचा आणि भूगोलाचा इतका दांडगा अभ्यास असणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र कोठे.

सभागृहात कौतुक: “आमदार असावा तर देवेंद्र कोठेंसारखा!”
देवेंद्र दादांच्या अभ्यासू वृत्तीची आणि लोकसेवेची मोहिनी केवळ सोलापूरवरच नाही, तर थेट विधिमंडळावर पडली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चालू अधिवेशनात संपूर्ण सभागृहासमोर दादांच्या कामाची मुक्तकंठाने दाद दिली. त्यांनी गौरवाने उद्गार काढले की, “आमदार कसा असावा, तर तो देवेंद्र कोठे यांच्यासारखा असावा!” हा गौरव केवळ दादांचा नाही, तर संपूर्ण सोलापूरकरांचा सन्मान आहे.

फडणवीस साहेबांनी हेरलेला ‘कोहिनूर’
राज्याचे दूरदृष्टी लाभलेले नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या मातीतून एक ‘कोहिनूर हिरा’ कोठेंच्या रूपाने अचूक हेरला. त्यांनी दादांच्या पाठीवर हात ठेवत इतक्या कमी वयात मोठी राजकीय ताकद दिली. देवेंद्र दादांनीही या संधीचे सोने करून दाखवले आहे. फडणवीस साहेबांनी दाखवलेला हा विश्वास दादांनी आपल्या अहोरात्र परिश्रमाने सार्थ ठरविला असून, आज ते सोलापूर भाजपचा मुख्य ‘ब्रँड’ म्हणून उदयास आले आहेत.
सोलापूरच्या विकासकामांचे प्रेरणास्थान असणारे आणि सोलापूरच्या प्रगतीचे शिल्पकार, लाडके आमदार श्री. देवेंद्र दादा कोठे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! ईश्वराकडे प्रार्थना आहे की, दादांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच अविरत देशसेवा आणि जनसेवा घडत राहो!
शुभ जन्मदिवस दादा!

-अक्षय अंजिखाने
(मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक, सोलापूर)
