अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करा; युवासेनेचे शिक्षण विभागाला निवेदन

अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करा; युवासेनेचे शिक्षण विभागाला निवेदन

सोलापूर : सोलापूर शहर तसेच जिल्ह्यात शासकीय मान्यता नसताना सुरू असलेल्या अनधिकृत शाळांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा युवासेनेच्या वतीने युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख रमेश चौगुले, जिल्हाप्रमुख राम वाकसे आणि युवासेनेचे सोलापूर शहरप्रमुख तुषार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
यासंदर्भात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांना निवेदन देऊन अनधिकृत शाळांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परवानग्या व मान्यता न घेता काही शाळा सुरू असल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत आहेत. अशा शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. असल्याचे युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख रमेश चौगुले यांनी यावेळी सांगितले.

अनधिकृत शाळांमुळे पालकांची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व शाळांची शासकीय मान्यता, आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन याबाबत सखोल तपासणी करण्यात यावी. मान्यता नसलेल्या शाळांवर नियमानुसार तात्काळ कारवाई करून पालकांना व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख तुषार आवताडे यांनी “विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, अनधिकृत शाळांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये,” अशी भूमिका मांडली.

शिक्षण विभागाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शहर व जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख खंडू सलगरकर, शिवा माळी, कॉलेज कक्षाचे समर्थ गायकवाड, नितीन काटकर, गणेश होटकर, युवासेनेचे दक्षिण सोलापूर उपतालुकाप्रमुख सागर कोकरे, शहर मध्य विधानसभा चिटणीस प्रकाश नाईकवाडी, उपशहरप्रमुख भीमसेन खांडेवाले आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.