सोलापूर : मोची समाजासाठी सोलापूर शहरातील सिटी सर्व्हे क्रमांक ६१७२ मधील पोटफाडी लगत असलेल्या महानगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या “श्री जांबमुनी भवन” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी ₹२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच महापौर विनायक कोंड्याल यांनी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल मोची समाजाच्या कन्या तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला हरिष जंगम यांनी दोन्ही मान्यवरांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
निर्मला जंगम म्हणाल्या की, मोची समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी उपलब्ध करून दिलेला ₹२ कोटींचा निधी आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत मोलाचा ठरला आहे. या दोन्ही मान्यवरांच्या सहकार्यामुळे समाजाच्या विकासाचा एक ऐतिहासिक टप्पा साकार होत आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून महासभेत श्री जांबमुनी भवन उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी या निर्णयास पाठिंबा देणाऱ्या नगरसेवक मधुसूदन जंगम व ऋषिकेश मेट्रे तसेच सर्व माननीय सदस्य, महानगरपालिका प्रशासन आणि समाजबांधवांचेही आभार मानले.
यावेळी निर्मला जंगम यांनी विश्वास व्यक्त केला की, मोची समाज बांधवांसाठी सभागृह, वाचनालय, अभ्यासिका, व्यायामशाळा तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधांनी युक्त असे सुसज्ज “श्री जांबमुनी भवन” उभारण्यात येणार असून, हे भवन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल. हे भवन भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि समाजाच्या प्रगतीला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

