सोलापूर – उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील शेतकरी राजाराम रामचंद्र बनसोडे यांनी ॲड. योगेश नागनाथ पवार यांचेमार्फत दाखल केलेल्या खाजगी फिर्यादीत दिनांक १८ जुलै २०२६ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती ऐश्वर्या सागर जाधव यांच्या न्यायालयाने अशोककुमार खरात यांचेसह एकूण सहा आरोपींना नोटीस काढण्याचे आदेश दिले आहेत.

सदर खाजगी फिर्यादीत आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. सदर फिर्यादीत कॉग्निझन्स घेण्यापूर्वी आरोपीलाही ऐकून घेण्याची संधी मिळावी, म्हणून कोर्टाने सर्व आरोपीना नोटीस काढली असल्याचे ॲड. योगेश पवार यांनी सांगितले.
फिर्यादीनुसार, बनसोडे यांची ११ एकर ०८ गुंठे शेतजमीन कमी किंमतीत लाटून घेण्यात आली आणि नंतर तीच जमीन खोटी फळबागायत दाखवून कोट्यवधी रुपयांना विकण्यात आली. आरोपी अशोक खरात हे जादूटोणा व अंधश्रद्धेचा आधार घेऊन शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे प्रकरण पुढील सुनावणीच्या टप्प्यात पोहोचले आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड. योगेश नागनाथ पवार हे बाजू मांडत आहेत.

