सोलापूर – विजापूर रोडवरील सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने आयोजित श्री गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता पालखी प्रदक्षिणेने झाली. महापौर विनायक कोंड्याल यांनी स्वामींची पालखी खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा घातली. यावेळी उपस्थित भक्तांनी स्वामी समर्थांचा जयघोष केला त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते.
गुरुपौर्णिमेनिमित्त २६ ते २९ जुलै दरम्यान आयोजित या महोत्सवात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. चारही दिवस भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. २९ जुलै रोजी सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ मूर्तीवर रुद्राभिषेक विनय शिंदे, प्रसाद राऊत, केदारनाथ मेंढापूरकर दांपत्याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पौरोहित्य वैभव कामतकर आणि कुबेरदत्त शुक्ला या गुरुजींनी केले.
सकाळी श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे सामूहिक पारायण रोहिणी पावडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. ४०० भाविक पारायणासाठी बसले होते.
रात्री महापौर विनायक कोंड्याल, महापालिका स्थायी समितीच्या सभापती रंजिता चकोते,ॲड. मिलिंद थोबडे, डॉ. लक्ष्मीकांत दामा, महापालिकेचे लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, योगी कोंडावतीन, सचिन चव्हाण, अभिषेक आपटे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी महापौरांच्या हस्ते ॲड. थोबडे यांचा सत्कार करण्यात आला.
महोत्सवात पहिले तीन दिवस श्री गुरुलीलामृत पोथीचे सामूहिक पारायण जयश्री शिनगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आदिती भजनी मंडळाने सुरेल भजनसेवा सादर करून उपस्थित भाविकांना भक्तिरसात तल्लीन केले. मान्यवरांचे हस्ते आरती झाली. किरण जोजारे यांनी भक्ती संगीताचा कार्यक्रम तर स्वरा महिला भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर भारतीय शास्त्रीय नृत्यातील कुचीपुडी नृत्यांगना मायथ्रीये यांनी महिषासुर मर्दिनी हे दिव्य नृत्य सादर केले.
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश मेंढापूरकर, पंडित गायकवाड, श्रीशैल लिगाडे, रविशंकर हत्याळीकर, नागेश हत्याळीकर व स्वामी भक्तांनी परिश्रम घेऊन गुरुपौर्णिमा महोत्सव यशस्वी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगीनाथ वनारोटे यांनी केले.

