सोलापूर : आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच उत्सव काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विभागीय स्तरावर समन्वय बैठका आयोजित करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.
महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने महानगरपालिकेने याबाबत कार्यालयीन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सर्व विभागीय कार्यालयांच्या स्तरावर गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह समन्वय बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस संबंधित विभागीय कार्यालयाचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) चे संबंधित अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच गणेशोत्सव मध्यवर्ती मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तसेच संबंधित विभागातील सर्व सन्माननीय नगरसेवकांनाही बैठकीस उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्याच्या सूचना संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव काळात नागरिकांना व गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या कालावधीत आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये गणेश मंडळांना आवश्यक सुविधा, वीजपुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता तसेच उत्सव काळातील इतर नागरी सुविधांबाबत संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधला जाणार आहे.
गणेशोत्सव हा शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकतेचा महत्त्वाचा उत्सव आहे. त्यामुळे महानगरपालिका, महावितरण, पोलीस विभाग, गणेशोत्सव मंडळे आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिल्या आहेत. तसेच या कामात कोणत्याही प्रकारची हयगय अथवा कसूर झाल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कार्यालयीन आदेशाद्वारे देण्यात आला आहे.
— सोलापूर महानगरपालिका, सोलापूर

