सोलापूर – संभाजी आरमारच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त वोरोनोको प्रशाला मैदान येथे “वज्रमुठ मेळावा” आयोजित करण्यात आला होता. संभाजी आरमारच्या हजारो मावळ्यांच्या जोषपूर्ण उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या मेळाव्याचा शुभारंभ झाला. अक्कलकोटचे आमदार सचिन (दादा) कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र (दादा) कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भारतीय जनता पार्टी चे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सोलापूर शहर-जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये योगदान देऊन सोलापूरचा लौकिक वाढविणाऱ्या घटकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अन्नदान सेवेला प्राधान्य देत लोकांना भक्ती मार्गात आणणाऱ्या जन्मेजय महाराज भोसले यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण देशभरात सोलापूरला युनिफॉर्म हब म्हणून ओळख निर्माण करत हजारो हातांना रोजगार देणाऱ्या गारमेंट उद्योजक तसेच सोलापूरी चादरीच्या माध्यमातून देश- विदेशाच्या उद्योग जगतात सोलापूरला ओळख देणाऱ्या सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघाला देखील सन्मानित करण्यात आलं. शिक कबाबच्या माध्यमातून गल्ली ते दिल्ली खवय्यांना तृप्त करत सोलापूरच्या खाद्य संस्कृतीला जगात ओळख देणाऱ्या सोलापूरच्या खाटीक समाज बांधवांचा सन्मान केला. अजनाळे ता. सांगोला येथील शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या माध्यमातून क्रांती करत डाळिंब उत्पादनाचा विक्रम करत एका वर्षात तब्बल 150 कोटी रुपये उत्पन्न घेतले. या प्रेरणादायी कार्याबद्दल अजनाळे ग्रामस्थांचा देखील सन्मान केला.

यावेळी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सोलापूरच्या आदिला नदी-नाला प्रश्नामुळे बाधित होत असलेले मिळकतधारक, सर्वसामान्य सोलापूरकरांच्या छोट्या-मोठ्या जागेवर होत असलेलं अतिक्रमण, दिव्यांग बांधवांच्या महापालिका निधीचा प्रश्न, रिक्षाचालक कल्याणकारी मंडळाची प्रभावी अंमलबजावणी आदी विषय सोडविण्याची भूमिका मांडली. तसेच वाढता जातीयवाद रोखण्यासाठी संभाजी आरमारच्या मावळ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील केले. यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी 18 वर्षांपासून संभाजी आरमार करत असलेल्या लोकोपयोगी कार्याचे कौतुक केले. संभाजी आरमारने सोलापूरकरांच्या सांगितलेल्या सर्व अडचणी सोडविण्याचा ठाम शब्द देत सोलापूरकरांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना ठोकून काढण्याचे पोलीस प्रशासनाला जाहीर आदेश दिले. जनतेच्या सेवेत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे देखील आश्वासन दिले. संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी माजी उपमहापौर नानासाहेब काळे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आलुरे, संभाजी आरमार सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, संघटक राज जगताप, रेवण कोळी, शिक्षक संघटना अध्यक्ष अजिंक्य पाटील, उपाध्यक्ष राजू आखाडे, उपशहरप्रमुख सागर दासी, द्वारकेश बबलादीकर, दिव्यांग संघटना प्रमुख वासुदेव होणकोंबडे, रिक्षा संघटना प्रमुख तानाजी जाधव, महिला आघाडीच्या उमा रजपूत, रेखा व्हनकडे, विद्यार्थी संघटना प्रमुख गणेश नागणे आदी उपस्थित होते.

या वेळी छत्रपती शिवाजी महाराज – छत्रपती संभाजी महाराज यांचे तेजस्वी जीवन चरित्र साक्षात उभा करणारा शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या शाहिरी जलशाचे यावेळी सादरीकरण झाले.

