मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरातील गोरगरीब व कष्टकरी कामगारांच्या मुलांसाठी यंदा ५६ हजार वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या माध्यमातून विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम सलग तिसऱ्या वर्षी राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाची सुरुवात २०२४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त ५४ हजार वह्यांचे वाटप करून करण्यात आली होती. त्यानंतर २०२५ मध्ये ५५ व्या वाढदिवसानिमित्त ५५ हजार ५५५ वह्यांचे वितरण करण्यात आले. यंदा ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप करून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.

आज विधिमंडळाच्या कामकाजानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते या वह्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी विधानसभा अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर साहेब, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार भाऊ गोरे, विधान परिषदेचे आमदार मा. धनंजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, गोरगरीब कुटुंबातील मुले तसेच कामगार वसाहतींमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून विष्णुपंत तात्यासाहेब कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वह्यांचे वाटप करण्यात येते.

आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी सांगितले की, शिक्षण हा समाज परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही जबाबदारी मानून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हजारो विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळणार आहे.