सोलापूर – निराळे वस्ती येथील लोकांना सातबारा मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू आणि येथील जाचातून भयमुक्त करू असे आश्वासन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले.
प्रभाग सात मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ निराळे वस्ती येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी होळकर कुटुंबाचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शहराध्यक्ष महेश गादेकर, शेरू शेख यांच्यासह उमेदवार सुमित भोसले, मनीषा माने, शितल गादेकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापुरात सध्या दडपशाहीचे राजकारण सुरू असल्याचे सांगत आम्ही जे भोगले आहे तेच आता सोलापूरकरांना भोगण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. परंतु सोलापूरकरांनी एकजुटीने या दडपशाहीचा विरोध केला पाहिजे. निराळे वस्ती चिंच नगर परिसरातील नागरिकांना अजूनही सातबारे नाहीत. ते सातबारा देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांनी आपल्या भाषणात सोलापूरच्या क्रांतिकारी विचारांवर प्रकाशझोत टाकला. सोलापूर ही क्रांतिकारी विचारांची भुमी राहिली आहे. विविध भाषिक विविध समाजाचे लोक इथे राहतात. सोलापुरात संपूर्ण भारत असल्याची जाणवते. धनगर समाजाला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नेहमी केले आहे. धनगर समाजाने देखील लढणाऱ्या माणसांसोबत उभे राहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उमेदवार सुमित भोसले यांनीही भाषण करत प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वचन दिले.
यावेळी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, शहर सरचिटणीस चंद्रकांत पवार, युवती शहराध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण, प्रशांत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

