भाजपकडून बीबीदारफळमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; इंद्रजीत पवार यांचा अर्ज दाखल

भाजपकडून बीबीदारफळमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन; इंद्रजीत पवार यांचा अर्ज दाखल


सोलापूर – जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ गटात भारतीय जनता पार्टीने राजकीय ताकद दाखवत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपचे उमेदवार इंद्रजीत पवार यांनी भव्य मोटारसायकल रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

मार्डी गावातून सुरू झालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार हुतात्मा स्मारक व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात पोहोचली.

यावेळी माजी आमदार दिलीप माने, भाजपचे प्रदेश नेते शहाजी पवार, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, माजी सभापती संध्याराणी पवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, बीबीदारफळ गणातून सुनीता अरुण बारसकर तर मार्डी गणातून तेजस्विनी अमोल बोराडे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपने पंचायत समिती निवडणुकीसाठी बीबीदारफळ गणातून सुनीता बारसकर यांना उमेदवारी देत स्थानिक राजकारणात निवडणूक लढतीला वेग दिला आहे.