सोलापूर : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 13 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार दि. 12 ऑगस्ट 1975 ते 2023 कालावधीतील लाड कमिटी अंतर्गत आलेल्या नव्या अर्ज आणि नियमित अर्जावर स्वतंत्र यादीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा निर्णय विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यावेळी महापालिकेतील कामगारांसंदर्भातल्या विविध विषयावर चर्चा झाली, अशी माहिती माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी दिलेल्या निवेदनातील मागण्यांसंदर्भात नागपूर येथे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी नगरसेवक तोफिक शेख, गणेश पुजारी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 13 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार दि. 12 ऑगस्ट 1975 ते 23 फेब्रुवारी 2023 या कालावधीतील सर्व प्रलंबित प्रकरणांना लाड कमिटी या तरतुदी लागू राहणार आहेत. या निर्णयानुसार संबंधित कालावधीतील सोलापूर महापालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या निर्णयानुसार वर्षभरात 808 लोकांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, 2021 मध्ये सोलापूर महापालिकेचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला. यामध्ये सफाई कामगारांची 1632 पदे मंजूर आहेत.
सद्यस्थितीत 44 पदे रिक्त आहेत, अशी माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. यासंदर्भात नव्याने आलेले अर्ज आणि नियमित अर्ज यावर स्वतंत्र कार्यवाही करावी, असा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेतील 249 रोजंदारी व बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासंदर्भातला विषयावर चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास आस्थापना खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या स्थितीत महानगरपालिकेवर हा अतिरिक्त आर्थिक भार उचलणे शक्य होणार नाही.या पार्श्वभूमीवर, त्यांना सेवेत कायम सामावून घेण्याकरिता त्यांच्या वेतन, निवृत्तीनंतरचे लाभ तसेच ‘लाड-पागे समिती’ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निरंतर लाभ यासाठी १०० टक्के आर्थिक अनुदान शासनामार्फत मंजूर करण्यात यावे. असे आर्थिक सहाय्य उपलब्ध झाल्यास या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबात आवश्यक ते आदेश शासन स्तरावरुन निर्गमित करण्यात यावे, असा प्रस्ताव सोलापूर महापालिका आयुक्तांनी नगर विकास विभागाला पाठविला आहे. त्यावर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी, असे आदेश विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. या संदर्भात नगर विकास विभागाचे अधिकारी जयंत वाणी यांनी काही दिवसात प्रस्तावाचा अभ्यास करून कळविण्यात येईल, असे स्पष्ट केले.
त्या कार्यमुक्त 15 जणांना दिलासा मिळणार
विनापरवानगी दीर्घकाळ सेवेत गैरहजर राहिल्या प्रकरणी महापालिकेतील पंधरा सेवकांना आयुक्तांनी कार्यमुक्त केले होते. यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. कुटुंबांचा विचार करून सहानुभूती म्हणून त्यांना पुन्हा संधी देता येईल का अशी विचारणा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केली. नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. संबंधित सेवकांनी अपील करावे. त्यानंतर त्या 15 जणांना पुन्हा संधी देता येईल मात्र ही शेवटची संधी असेल, असे स्पष्टीकरण महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिले. यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे.
दोन पेक्षा अधिक आपत्य असणाऱ्या सफाई कामगारांना नियुक्ती देणार
लाड समितीच्या शिफारशी नुसार व सुधारित शासन निर्णयाच्या आधारे दोन पेक्षा अधिक आपत्य असणाऱ्या सफाई कामगार वारसास नियुक्ती देणे संदर्भात सविस्तर नगरविकास विभाग अधिकारी व सोलापुर महानगर पालिका आयुक्त यांच्याशी चर्चा झाल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेच्या बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल सोलापूर महानगरपालिका कामगार प्रतिनिधी श्री बाळासाहेब शिंदे यांच्या वतीने विधानसभा उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब बनसोडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

