सोलापूर – ऐन महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला धक्का देण्यात राष्ट्रवादीचे शहर – जिल्ह्याध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांना मोठे यश आले आहे. राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बालाजी सरोवर येथे शनिवारी सकाळी माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला.
अण्णा बनसोडे तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. मागील दोन दिवसात वकील मंडळींसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर शेवटच्या दिवशी सोलापूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षातील मोठा मासा आपल्या गळाला लावला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे यांच्या उपस्थितीत अण्णा बनसोडे यांच्या हस्ते माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांच्या गळयात राष्ट्रवादीचे उपरणे घालून त्यांना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश देण्यात आला. आज काँग्रेसमधील मोठे प्रस्थ राष्ट्रवादीत आले आहे, लवकरच आणखी मोठे लोक राष्ट्रवादीत प्रवेश करतील,असे अण्णा बनसोडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अजितदादा पवार यांच्या कामावर खूष होऊन आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हेत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
सर्वच पक्षामधून अजितदादा पवार यांच्या कामावर खूष होऊन अनेकांचे प्रवेश होत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब असून निवडणूकीच्या तोंडावर आणखी मोठे राजकीय भूकंप सोलापूरकरांना पाहावयास मिळतील, असे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सांगितले.
