महाराष्ट्राचा विकासपुरुष‎ हरपला… खरंच‎ आमचा बाप‎ माणूस गेला‎

महाराष्ट्राचा विकासपुरुष‎ हरपला… खरंच‎ आमचा बाप‎ माणूस गेला‎

सोलापूर -‎ महाराष्ट्र‎ राज्याच्या‎ राजकारणात‎ विकासाचा‎ दूरदृष्टीकोन‎ घेऊन‎ चालणारा, कार्यकर्त्यांच्या‎ पाठीशी खंबीरपणे‎ उभा‎ राहणारा आणि‎ संपूर्ण राज्याला कुटुंब‎ मानणारा‎ नेता‎ आज‎ हरपला आहे. उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांच्या‎ रूपाने‎ आम्ही‎ केवळ‎ एक नेता नाही,‎ तर आमचा‎ बाप माणूस गमावला आहे,‎ अशी‎ अत्यंत‎ भावनिक प्रतिक्रिया नगरसेवक किसन‎ जाधव यांनी व्यक्त केली‎ बुधवारी सकाळी‎ बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीचे‎ राष्ट्रीय अध्यक्ष‎ तथा‎ राज्याचे‎ विद्यमान‎ उपमुख्यमंत्री‎ अजित‎ पवार यांचे दुःखद‎ निधन झाल्याची बातमी समजताच‎ संपूर्ण‎ देशासह‎ महाराष्ट्रात शोककळा‎ पसरली आहे.‎

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चाणक्य, दूरदृष्टी‎ असलेला‎ आणि‎ विकासाची‎ घोडदौड अविरत‎ सुरू ठेवणारा‎ नेता‎ काळाच्या‎ पडद्याआड गेला आहे.‎ नगरसेवक किसन जाधव पुढे म्हणाले‎ की,‎ अजित पवार हे केवळ‎ पदावरचे नेते नव्हते, तर‎ कार्यकर्त्यांना बळ‎ देणारे,‎ विश्वास‎ देणारे‎ आणि‎ वेळप्रसंगी‎ कुटुंबप्रमुखासारखी जबाबदारी‎ घेणारे‎ नेतृत्व‎ होते. मी‎ राष्ट्रवादी‎ काँग्रेस‎ पार्टीत सक्रिय‎ कार्यकर्ता असताना तसेच सोलापूर जिल्हा‎ नियोजन समितीचा‎ सदस्य म्हणून काम करत‎ असताना,‎ केवळ‎ आणि केवळ अजित पवार‎ यांच्या कृपा व आशीर्वादामुळेच‎ ही जबाबदारी‎ निभावू शकलो. प्रभाग क्रमांक‎ २२ च्या‎ विकासासाठी त्यांनी‎ कोट्यवधी‎ रुपयांचा‎ निधी‎ उपलब्ध‎ करून‎ दिला.

विकासकामांच्या‎ बाबतीत‎ त्यांनी‎ कधीही नकार दिला‎ नाही. एक आपुलकीचा, कुटुंबातील‎ सदस्याप्रमाणे‎ माझ्याशी त्यांचे‎ नाते होते.‎ त्यामुळे‎ आज निर्माण‎ झालेली ही पोकळी कधीही‎ भरून‎ निघणार‎ नाही. महाराष्ट्राच्या‎ राजकारणात असा‎ नेता पुन्हा होणार‎ नाही,‎ अशी‎ खंत‎ त्यांनी‎ व्यक्त‎ केली. आज‎ घरातला कुटुंबप्रमुखच‎ हरपल्यासारखं वाटत‎ आहे. त्यांच्या प्रेमावर, विश्वासावर‎ आणि‎ मार्गदर्शनावर आम्ही उभे होतो. त्यांच्या विकासात्मक धोरणांवरच‎ आजपर्यंत‎ काम‎ केलं‎ आणि पुढील‎ काळातही‎ त्यांच्याच‎ दूरदृष्टीच्या‎ विचारांनी काम करत‎ राहू, असे सांगताना किसन‎ जाधव यांचे मन दुःखाने‎ भरून आले.‎

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना‎ मी‎ खूप‎ जवळून‎ पाहिले.‎ माझ्यावर त्यांचे‎ विशेष प्रेम‎ व विश्वास‎ होता.‎ त्यांचा‎ निष्ठावंत‎ कार्यकर्ता‎ म्हणून मी‎ नेहमी‎ प्रामाणिकपणे‎ काम केले.‎ त्यांचे‎ आशीर्वाद सदैव आमच्या‎ पाठीशी राहतील, असा भावनिक विश्वासही त्यांनी‎ व्यक्त केला.‎ खरंच, आज आमचा बाप‎ माणूस‎ निघून‎ गेला आहे,‎ अशा शब्दांत‎ त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जाधव–गायकवाड आणि‎ इछा भगवंताची परिवाराच्या‎ वतीने दिवंगत‎ उपमुख्यमंत्री अजित‎ पवार यांना‎ भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण‎ करण्यात‎ आली.‎