सोलापूर : BCCI चे वतीने आयोजित 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना चौथ्या दिवशी महाराष्ट्राने 5 गडी राखून जिंकत 6 गुण प्राप्त करत गटात आघाडीचे स्थान मिळवले.
चौथ्या दिवशी सकाळी हिमाचल प्रदेश ने त्यांच्या दुसरा डाव 190 वरून पुढे चालू केला आणि अक्षय वशिष्ठ ने त्याचे अर्धशतक पूर्ण करत धावसंख्या 200 पार नेली. महाराष्ट्र कर्णधाराने सुआशिक जगताप ला बोलाविले आणि त्याने वशिष्ठला (53 धावा) त्रिफळाचित करत जोडी फोडली आणि लगेच 2 चेंडू नंतर शुभम कदम ने लक्ष्य ठाकूर याला कर्णधार साहिल कडे झेल देण्यास भाग पाडले.
नंतर आलेल्या नौनिहाल आर. ने सिद्धक धील्लोन सोबत 9 व्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी रचली पण चोरटी धाव घेण्याच्या गडबडीत नौनिहाल (17 धावा) धावबाद झाला. तळातील फलंदाज अंश धीमन ने सिद्धक सोबत आघाडी 130 चे पार नेली.
शेवटी शुभम कदम ने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत सिद्धक (26 धावा)ला बाद करत डावात 5 वा बळी मिळवत हिमाचलचा दुसरा डाव 284 वर संपुष्टात आणला आणि महाराष्ट्राला विजयासाठी 134 धावा कराव्या लागणार हे निश्चित झाले. अंश धीमन 12 धावावर नाबाद राहिला. शुभम कदम सोबत सुआशिक जगताप ने 61 धावात 3, समकित सुराणा याने 1 बळी मिळवला.
2 डावा दरम्यानच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्राचा दुसरा डाव कर्णधार साहिल पारख आणि जशन सिंग यांनी सुरू केला आणि जेवणाला खेळ थांबे पर्यंत फटकेबाजी करत 7 षटकात 47 धावा केल्या. साहिल पारख ने आल्या आल्या फटकेबाजीला सुरुवात करत 2 चौकार, 3 षटकार सह 38 धावा कुटल्या आणि लवकरात लवकर विजय प्राप्त करण्याच्या दिशेने जबरदस्त सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले तर दुसऱ्या टोकाला जशन सिंग संयमी फलंदाजी करत होता.
जेवणानंतर विजयासाठी आवश्यक 87 धावा करायच्या होत्या पण नौनिहाल ने तिसऱ्याच चेंडूवर जशन सिंग (8) आणि सहाव्या चेंडूवर साहिल पारख (44) ला लागोपाठ बाद करत महाराष्ट्राला बोनस गुण मिळविण्यापासून दूर केले. त्यानंतर पहिल्या डावातील धमाकेदार फलंदाज इंद्रजीत ने आल्या आल्या षटकाराने सुरुवात केली खरी पण त्याला 12 धावा वर आणि ईशान खोंड (2) असे दोघांना सिद्धक धील्लोन ने स्वतःच्या गोलंदाजीवर टिपले. 78 धावात 4 खेळाडू बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली आणि महाराष्ट्राचा विजय लांबला.
त्यानंतर आलेल्या समकित सुराणा याने यष्टिरक्षक साई परदेशी सोबत 10 षटके टिच्चून फलंदाजी करत 23 धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा सिद्धक धील्लोन ने जोडी फोडताना समकितला (21) त्रिफळाचित केले आणि महाराष्ट्राचा निम्मा संघ 101 धावांत परतला. परंतु नंतर आलेला सुआशिक जगताप (नाबाद 25) ने साई परदेशी (नाबाद 18) सोबत 34 धावा जोडत चहापान पूर्वीच महाराष्ट्राचा विजय साकारला. हिमाचल कडून सिद्धक धील्लोन 27/3 बळी, नौनिहाल आर. 33/2 बळी मिळवले.
या विजयासह महाराष्ट्र संघाने गरजेचे 6 गुण प्राप्त केले असून 3 सामन्यात 16 गुणांसह क गटात आघाडीचे स्थान मिळवले असून महाराष्ट्राचा पुढील सामना 8 तारखेपासून पुण्यात आंध्र प्रदेश सोबत होणार आहे.

