पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा.. 19 वर्षाखालील मुलांची कूच बिहार क्रिकेट स्पर्धा

पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या 7 बाद 354 धावा.. 19 वर्षाखालील मुलांची कूच बिहार क्रिकेट स्पर्धा

सोलापूर : येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश हा BCCI च्या 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीचा सामना सुरू झाला असून पहिल्या दिवशी महाराष्ट्राने 7 गडी गमावत 354 धावा केल्या आहेत.


सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार साहिल ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य सिद्ध करताना ताबडतोब फलंदाजी करत पहिल्या 8 षटकात 60 धावा केल्या, 31 चेंडूत 8 चौकरानिशी 45 धावा करून साहिल पारख फलकावर 61 धावा असताना बाद झाला, त्यानंतर इंद्रजीत शिंदे ने आल्यापासून फटकेबाजी करत तडफदार अर्धशतक झळकावले. जेवणाला खेळ थांबला तेंव्हा 3 बाद 164 धावा (31 षटके) करत महाराष्ट्राने पहिल्या सत्रात सामन्यावर पकड मिळवली.

20 षटकात 92 धावांची भागीदारी रचून इंद्रजीत बाद झाला आणि त्याच्या पाठोपाठ ईशान खोंड (0) , समकित सुराणा (8) बाद झाले. हिमाचलच्या नौनिहाल ने लागोपाठ 2 गडी बाद करत 1 बाद 150 वरून 4 बाद 164 अशी धावसंख्या केली. पण त्यानंतर सलामीवीर जशन सिंग याने यष्टिरक्षक साई परदेशी सोबत संयमी फलंदाजी करत 58 धावांची भागीदारी रचली आणि आपले अर्धशतक देखील पूर्ण केले. साई [34(56)] बाद झाल्यावर सुआशिक जगताप याने एक बाजू लावून धरत धावफलक हलता ठेवला.

जशन सिंग 70 धावा काढून अंश धिमन चा बळी ठरला.
त्यानंतर अरकाम सय्यद हा खेळण्यास आला आणि जगताप हा खेळताना जायबंदी झाला व चहापानाला खेळ थांबला, तेंव्हा 6 बाद 258 (58.2 षटके) धावा झालेल्या.

चहापान नंतर खेळ सुरू झाला आणि तिसऱ्याच षटकात पुन्हा अंश धिमन ने अरकाम (6) ला बाद करत तिसरा बळी टिपला.
शेवटच्या सत्रातील खेळात शुभम कदम सह सुआशिक जगतापने 90 धावांची भागीदारी करत आपले अर्धशतक झळकाविले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभम कदम नाबाद 43 व जगताप नाबाद 71 धावा करून खेळपट्टीवर तग धरून आहेत.

हिमाचल प्रदेश संघाकडून अंश धीमन ने 62/3 बळी तर नौनिहाल 2 बळी व अक्षय वशिष्ठ, आर्यन ठाकूर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला आहे.


सामन्याचा उद्या दुसरा दिवस असून सकाळच्या सत्रात महाराष्ट्र संघ पुढे आणखी किती धावा जोडतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.