सोलापूर : ‘ईच्छा भगवंताची’ नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी लेझीम सरावाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते लेझीम व वाद्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तिमय वातावरणात लेझीम सरावाला सुरुवात झाली.
यावेळी मंडळाचे मार्गदर्शक ॲड. अनिल जाधव, भाजपा नगरसेवक किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, युवा नेते चेतन नागेश अण्णा गायकवाड, अजिंक्य जाधव, करण जाधव, उत्कर्ष गायकवाड, प्रथमेश गायकवाड, तेजस गायकवाड, तुषार गायकवाड, मोहित गायकवाड, कार्तिक जाधव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण मामा जाधव म्हणाले, लेझीम हा केवळ पारंपरिक खेळ नाही, तर तो शिस्त, एकजूट, संस्कार आणि संघटनाची शिकवण देणारे माध्यम आहे. आजच्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपल्या संस्कृतीशी आणि परंपरेशी जोडले जावे, हा ‘ईच्छा भगवंताची’ परिवाराचा सातत्याने प्रयत्न आहे.

नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना एकत्र आणत सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करण्याचे कार्य आम्ही करत आहोत. भाजपा नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले, शेकडो नव्हे तर सुमारे एक हजार युवकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये शिस्त आणि संघटनेची भावना निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून, व्यसनांपासून दूर राहण्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचत आहे.
ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाची लेझीम पथकाची शिस्तबद्ध मिरवणूक सोलापूर शहरात विशेष परिचित आहे. यंदाच्या वर्षी उत्सव अध्यक्ष म्हणून अंबादास जाधव यांची निवड झाली असून घटस्थापना दिवशी शक्तिदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीत शेकडो युवक लेझीम व पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपली कला सादर करतात.

महाराष्ट्राची आराध्य व कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभाव, शिस्त आणि उत्साहाने होणारा हा सराव नवरात्रोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. युवकांना संस्कृतीशी जोडण्याबरोबरच त्यांच्यात सामाजिक जाणीव, शिस्त आणि संघटन निर्माण करण्यासाठी ‘ईच्छा भगवंताची’ परिवाराचे हे कार्य उल्लेखनीय ठरत असून, लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो युवकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम सोलापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात लक्षवेधी ठरत आहे.
