सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर काल पासून सुरू झालेल्या BCCI 19 वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्यात दुसऱ्या दिवशीच्या खेळात महाराष्ट्राने पहिल्या डावात सर्व बाद 421 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा हिमाचल प्रदेशने 7 बाद 200 धावा केल्या असून अद्यापि 221 धावांनी पिछाडीवर आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात नाबाद जोडी ने खेळ पुढे सुरू केला पण 5व्याच षटकात शुभम कदम (47) ला अंश ने यष्टिरक्षक कर्णधार आदित्य कटारिया कडे झेल देण्यास भाग पाडले आणि जोडी फोडली, दोघांनी 8व्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या तळातील फलंदाज अनिश जोशी ने देखील ताबडतोब फटकेबाजीला सुरुवात केली. संयमी फलंदाजी करत असलेल्या सुआशिक ला अक्षय वशिष्ठ ने त्रिफळाचित बाद करत त्याचे शतक हुकवले. जगताप ने 143 चेंडूत 7 चौकार सह 87 धावा केल्या. अंतिम खेळाडू हर्षिल सावंत सोबत अनिश ने धावफलक हलता ठेवत 421 पर्यंत धावसंख्या नेली पण तेंव्हाच तो पायचीत झाला आणि तासाभरात 67 धावा करत महाराष्ट्राचा पहिला डाव 107व्या षटकात संपुष्टात आला.
हिमाचल प्रदेश कडून 15 अतिरिक्त धावा देताना अंश धीमन 84/4 बळी, नौनिहाल आर. 100/3 बळी, अक्षय वशिष्ठ 70/2 बळी तर आर्यन ठाकूर ने 1 बळी मिळवला.
दोन डाव्यांच्या मधल्या वेळेनंतर लगेच हिमाचल प्रदेश चा पहिला डाव सुरू झाला आणि मध्यमगती गोलंदाज अनिश जोशी ने आपला जादुई स्पेल सुरू केला व दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षय शर्माला बाद करत झटका दिला. त्यानंतर जेमतेम 32 धावांची भागीदारी करत असताना पुन्हा अनिश ने कर्णधार आदित्य कटारिया जो चेंडू गणिक धावा करत होता त्याला (24/24) यष्टिरक्षक साई कडे झेल देण्यास भाग पाडले आणि जोडी फोडली. यावेळीच जेवणासाठी पंचांनी खेळ थांबविला तेंव्हा धावसंख्या 2 बाद 34 (9.5षटके) होती.
जेवणानंतर खेळ सुरू झाला आणि पुन्हा अनिश ने आपली जादुई गोलंदाजी कायम राखत 16 व्या षटकात 2 चेंडूच्या फरकाने अरमान विज, अक्षय वशिष्ठ यांना शून्यावर माघारी धाडले व पहिले चारही बळी मिळवले. त्याच्याच सोबत मग हर्षिल सावंत ने देखील सचिन मेहता (1) याला पण यष्टिरक्षक करवी झेलबाद केले आणि दोघांनी मिळून हिमाचलचा निम्मा संघ केवळ 54 धावांत गारद केला.
सलामीचा फलंदाज अर्पित सिंग याने नौनिहाल सोबत थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न चालू ठेवला पण पुन्हा सावंत ने झटका दिला तो नौनिहाल (9) ला बाद करत.
त्यानंतर आलेल्या आर्यन ठाकूर ने मात्र सलामीवीर अर्पित सिंग सोबत संयमी फलंदाजी करत संघाची धावसंख्या चहापान पर्यंत 6 बाद 134 केली.
चहापान नंतर पुन्हा दोघांनी उपयुक्त अशी संयमी फलंदाजी चालूच ठेवली आणि दरम्यान अर्पित ने त्याचे अर्धशतक पूर्ण करत हिमाचलची होणारी पडझड थांबवली. दोघांच्या दरम्यान 87 धावांची भागीदारी आणि 160 धावा झाल्या असताना शुभम कदम ने अर्पित (74, 165 चेंडू, 11 चौकार) याला त्रिफळा बाद केले व मोठा अडसर दूर केला.
हिमाचलच्या आर्यन सोबत आणखी एक ठाकूर, लक्ष्य फलंदाजीला आला व दोघांनी एक दोन धावा करत शेवटच्या सत्रात तासाभरात 40 धावांची भागीदारी रचत 200 धावांचा टप्पा गाठला असून महाराष्ट्राने फॉलोऑन लादण्यासाठी उर्वरित 3 खेळाडू 71 धावांत बाद करण्याची गरज आहे.
तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर जमलेली जोडी फोडून हिमाचल संघाला सर्व बाद करण्याची संधी महाराष्ट्र संघ किती षटकात मिळवतो ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फोटो –
- अर्पित सिंग (हिमाचल प्रदेश)
- अनिश जोशी (महाराष्ट्र)

