सोलापूर – नुकत्याच पार पडलेल्या अंध महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला असून त्या संघाची उप कर्णधार ही सोलापूरची गंगा कदम असून त्यानिमित्ताने आज तिचा सत्कार सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे वतीने अध्यक्ष दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच तिचे प्रशिक्षक राज शेळके यांचा देखील सन्मान संघटनेचे व्हाइस चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला असून अशा महिला खेळाडू पासून युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून सदर छोटेखानी कार्यक्रमात 21,000 चा धनादेश देऊन गंगा कदम हिस पुरस्कृत करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांचे समवेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन च्या महिला संघाच्या निवड समिती प्रमुख स्नेहल जाधव, मुलींच्याच 15 वर्षाखालील संघाच्या निवड समिती प्रमुख ऋचा शिंदे, सदस्य आणि मुंबई संघाच्या निवडकर्त्या नीलम पाटील यांच्यासह महाराष्ट्र, मुंबई संघाचे प्रमुख प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनील मालप व राजेंद्र गोटे यांनी करताना छोटेखानी सत्काराचे आयोजन सांगितले व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना गंगा हिने तिचे सोलापुरातील क्रिकेटची सुरुवात आणि त्यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे वतीने करण्यात आलेली मोलाची मदत सांगताना विश्वचषक स्पर्धेपूर्वी आणि दरम्यानचे अनुभव सांगत समोर उपस्थित युवा खेळाडूंना फिटनेस वर जास्तीत जास्त भर देण्याबद्दल सांगितले.
कार्यक्रम पार पडल्यावर महाराष्ट्र, मुंबई चे खेळाडू तसेच मैदानावर उपस्थित सर्वांनी गंगा सोबत फोटो काढून तिचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
