तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खूनप्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचार व खूनप्रकरणी आरोपीस फाशीची मागणी

सोलापूर : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करत पुण्यश्लोक साम्राज्य संघटना महाराष्ट्र तर्फे जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रशेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

डोंगराळे येथील सुवर्णकार समाजातील कन्या कु. यज्ञा जगदीश दुसाने (वय ३) हिच्यावर आरोपी विजय खैरनार यांनी नृशंस पद्धतीने लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून खून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संघटनेच्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :

या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपीवर विशेष न्यायालयात तातडीने खटला दाखल करावा.

हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” (Rarest of the rare) असल्याचे घोषित करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची राज्य शासनाकडे शिफारस करावी.

पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत व मानसिक आधार देण्यात यावा.

ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून अशा गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी कठोरात कठोर शिक्षा दिली जाणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.