सोलापूर – इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर येत्या १ डिसेंबर पासून BCCI च्या १९ वर्षाखालील मुलांच्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील तिसऱ्या फेरीतील महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश सामना रंगणार असून २८ नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ सोलापुरात दाखल होणार असून २९-३० नोव्हेंबर रोजी सकाळ दुपार सत्रात सराव करणार असल्याचे जिल्हा क्रिकेट संघटनेचे वतीने कळविण्यात आले आहे.
इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियम नुकेतच सोलापूर मनपा कडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडे हस्तांतरित केल्यानंतरचा हा पहिलाच सामना असल्याने सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून मुख्य खेळपट्टी उत्तम रित्या बनवली गेली आहे तसेच संपूर्ण मैदान हिरवेगार झाले आहे. जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने विविध समिती स्थापन करण्यात आल्या असून त्यात खेळाडू, क्रीडा संघटक, पदाधिकारी कार्यरत आहेत व जे ते आपल्या समितीचे काम उत्तमरित्या हाताळत आहेत.
दोन्ही संघ यापूर्वी प्रत्येकी २ सामने खेळले असून महाराष्ट्राने पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळविल्यानंतर दुसरा सामना अनिर्णित झाला होता तर हिमाचल प्रदेश संघ पहिल्या सामन्यात पराभूत तर दुसरा सामना अनिर्णित झाला होता.
क गटातील हे दोन्ही संघ सध्या अनुक्रमे दुसऱ्या आणि पाचव्या स्थानी असून महाराष्ट्राचे १० तर हिमाचल १ गुण आहेत.

मागील वर्षी याच मैदानावर महाराष्ट्र आणि केरळ मध्ये सामना झालेला व तो महाराष्ट्र संघाने जिंकला होता आणि सध्याचा महाराष्ट्र संघ पाहता महाराष्ट्राचे पारडे जड असल्याचे दिसते.
या सामन्यासाठी फिरोज घयास हे सामनाधिकारी तर पंच म्हणून इंद्रनील व अमन राज हे काम पाहणार आहेत.
सोलापूरचा समर्थ दोरनाल महाराष्ट्र संघात
सामन्यातील महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचे नेतृत्व साहिल पारख हा करत असून सोलापूरच्या समर्थ दोरनाल हा देखील संघात आहे.
दोन्ही संघ खालील प्रमाणे –
महाराष्ट्र : साहिल पारख, साई परदेशी, समकित सुराणा, सुश्रुत सावंत, जशान सिंग, ईशान खोंड, सौशिक जगताप, अर्काम सय्यद, अभिनंदन अडक, हर्षिल सावंत, रोनक अंदानी, यतीराज पाटोळे, इंद्रजीत शिंदे, समर्थ दोरणाल प्रथमेश झंवर
हिमाचल प्रदेश : आदित्य कटारिया (कर्णधार), अर्पित सिंग, वास्तव गर्ग, आरमान वीज, अक्षय वशिष्ठ, अंशुल शर्मा (यष्टिरक्षक), नौनिहाल, आर्यन ठाकूर, सिद्धक धिल्लोन, लक्ष ठाकूर, शिवांश कलथा, कार्तिकय शर्मा, अक्षय शर्मा पारस बडोगा, सचिन मेहता

