सोलापूर - वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिंगडगांव, शिरवळ (जै.) व होटगी या गावांमधून मागील चार महिन्यांत चोरीस गेलेल्या एकूण 4 मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या हस्तगत करण्यात वळसंग पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी करमाळा, पुणे जिल्हा व कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे तपास करून 4 आरोपींना अटक केली आहे. हस्तगत केलेल्या मोटारसायकली संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आल्या आहेत.
सदर मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना तपासिक अंमलदार पोहवा/ श्रीशैल माळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथे जाऊन तपास करून आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील चोरीस गेलेल्या 4 मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून तक्रारदारांना त्यांच्या मोटारसायकली परत मिळाल्या आहेत.
सदर कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण; तसेच राजेंद्र टाकणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकोट विभाग, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली व राहुल डोंगरे, प्रभारी अधिकारी, वळसंग पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये तपास अधिकारी पोहवा/ श्रीशैल माळी, पोहवा/ विकास क्षिरसागर तसेच मदतनीस पोना/ संतोष चव्हाण, पोकॉ/ महेश कुंभार व पोकॉ/ प्रसाद मांढरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
