सोलापूर : होम मैदान लगत असलेल्या स्ट्रीट बझार येथे मावा खाऊन थुंकणाऱ्या, टवाळखोरपणा करणाऱ्या सुमारे ७० ते ८० युवकांवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाईचा बडगा उचलला. शुक्रवारी मध्यरात्री आमदार देवेंद्र कोठे यांनी रस्त्यांच्या स्वच्छतेची पाहणी करताना स्ट्रीट बझार येथे मावा खाऊन थुंकणाऱ्या टवाळखोरांवर कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले होते.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाहणीला २४ तास उलटण्यापूर्वीच पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तत्काळ कारवाई केली. शनिवारी सायंकाळी दररोज प्रमाणे स्ट्रीट बझार येथे सोलापूरकरांनी येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटला. स्ट्रीट बझार सोलापुरातील नागरिकांसाठी लहान मुले, महिला भगिनी यांना बसता यावे, स्वच्छ आणि हवेशीर वातावरणात खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटता यावा या उद्देशाने बनविण्यात आले आहे. परंतु या ठिकाणी शहरातील काही टवाळखोर युवक दररोज येऊन मावा खाऊन थुंकणे, कचरा करणे, घाण करणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले होते. शुक्रवारी मध्यरात्री आमदार देवेंद्र कोठे हे शहरातील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करत असताना त्यांनी स्ट्रीट बझारचीही स्थिती प्रत्यक्ष भेट देऊन जाणून घेतली होती. यावेळी स्ट्रीट बझार येथे अनेक ठिकाणी मावा खाऊन थुंकल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या निदर्शनास आले होते.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी अशा युवकांवर कारवाई आवश्यक असल्याचे सांगतानाच नागरिकांनाही स्वच्छतेचे आवाहन केले होते. परंतु काही टवाळखोर युवक पुन्हा शनिवारी रात्री तोच प्रकार करण्यासाठी जमलेले असताना पोलिसांनी या युवकांना चांगलाच हिसका दाखवला. ७० ते ८० युवकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी रात्री बेरात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली.
शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्ट्रीट बझारसह शहरातील सार्वजनिक ठिकाणी मावा खाऊन थुंकणाऱ्या, शहरातील सार्वजनिक ठिकाणी विद्रुप करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बाबतीतील असाही योगायोग
सध्या राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त असलेले तुकाराम मुंढे सोलापूरला जिल्हाधिकारी असताना त्यांच्या जिल्हाधिकारीपदाच्या काळात
ज्या रस्त्यावरून मोठा गहजब झाला होता त्याच रस्त्यावर शनिवारी मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाईची सुरुवात झाली, हा एक योगायोग !
