सोलापूर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २१, २२ आणि २३ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आलेले ड्राय डे रद्द करावेत, अशी मागणी सोलापूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आधीच अडचणीत असलेल्या परमिट रूम व्यवसायावर सलग तीन दिवसांच्या ड्राय डेचा विपरीत परिणाम होणार आहे. तसेच, मद्यविक्री बंदीमुळे बेकायदेशीर मद्यविक्री वाढण्याची शक्यता असून, शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जाहीर केलेले ड्राय डे रद्द करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संजीव इंदापुरे यांनी या मागणीबाबत माहिती दिली. याप्रसंगी बालकिसन चकोले, अमर पाटील, त्रिगुण चौधरी, अजय काळे आणि उमेश साळुंखे उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनावर जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे संबंधित व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.
