Screenshot
सोलापूर : राजकारण हे तात्पुरत्या स्वार्थाचे साधन बनल्याच्या काळात गुरुवारी सोलापूरकरांना एक वेगळा अनुभव आला. आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलेल्या १४ वर्षांपूर्वीच्या आठवणीचे मात्र सोलापूरकरांनी आश्चर्यमिश्रित कौतुक केले.
गुरुवारी हि. ने. वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात थोर स्वातंत्र्य सेनानी भाई छन्नूसिंग चंदेले पुरस्कार वितरण कार्यक्रम माजी महापौर आणि संयोजिका नलिनी चंदेले यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी आणि शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र कोठे यांनी माजी महापौर आणि संयोजिका नलिनी चंदेले यांनी तब्बल १४ वर्षांपूर्वी एका निवडणुकीत केलेल्या कामाचा सविस्तर तपशील सांगत उपस्थितांना आवाक केले.
२०१२ साली झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी माजी महापौर नलिनी चंदेले तत्कालीन नगरसेवक देवेंद्र कोठे महापालिकेची निवडणूक लढवीत असलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये स्वतःहून आल्या. त्यांच्या संपर्कातील अनेक महिलांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी संवाद साधत, ‘तात्या कोठे यांचे नातू आणि महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे निवडणुकीस उभे आहेत त्यांना आपण निवडून आणलेच पाहिजे’, असे आग्रहाने सांगत प्रचार केला. आणि प्रचाराचे काम झाल्यावर आम्हा कोणालाही न सांगता, त्याची कुठेही फारशी वाच्यता न करता निघून देखील गेल्या, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
वास्तविक १४ वर्षांपूर्वी झालेली आणि सोलापूर महानगरपालिकेच्या एका प्रभागातील ही एक छोटी घटना होती. परंतु राजकारणातील आपल्या कर्तव्याविषयीची प्रतिबद्धता कशी असावी हे अधोरेखित करणारी माजी महापौर नलिनी चंदेले यांच्या बाबतीतील ही घटना असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
आमदार देवेंद्र कोठे यांनी तब्बल १४ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेची आठवण ठेवून हा किस्सा पुरस्कार वितरण कार्यक्रमात सांगितल्यानंतर उपस्थित सोलापूरकरांनी टाळ्यांनी प्रतिसाद तर दिलाच परंतु आमदार देवेंद्र कोठे यांच्या स्मरणशक्तीचे आणि आपल्याला केलेल्या मदतीची जाण ठेवण्याच्या वृत्तीचे आश्चर्यमिश्रित कौतुक देखील केले.
याच कार्यक्रमात आमदार देवेंद्र कोठे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमदार असूनही त्यांनी संयोजकांना मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रविणसिंह परदेशी यांच्या भाषणापूर्वी भाषण करण्याची परवानगी मागितली. भाषणाला उभे राहिल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, “मी प्रविणसिंह परदेशी यांच्या भाषणापूर्वी भाषण करण्याचे कारण असे की, पद येते आणि जाते. परंतु श्रेष्ठता आणि जेष्ठता कायम राहते.” ज्येष्ठ आणि निवृत्त सनदी अधिकारी असलेले आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार म्हणून काम करणारे प्रविणसिंह परदेशी यांच्या जेष्ठतेला आणि बुद्धीच्या श्रेष्ठतेला सन्मान देण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेली ही कृती देखील उपस्थित सोलापूरकरांना आवडल्याची चर्चा कार्यक्रमानंतर दिसून आली.
