सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या कामकाजाचा तसेच महापालिकेच्या मालकीच्या मिनी व मेजर गाळ्यांशी संबंधित वसुलीचा आढावा घेण्यासाठी महापौर श्री. विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आज कौन्सिल हॉल, महापौर कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी शहरातील विविध भागांमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीचे असलेले मिनी व मेजर गाळे, लँड फी तसेच इतर देयकांची वसुली याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित गाळेधारकांकडील थकीत रकमेचा आढावा घेऊन प्रलंबित वसुली प्रभावीपणे करण्याबाबत महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
महापालिकेच्या मालमत्तांमधून मिळणारे उत्पन्न हे महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, थकीत रक्कम वसुलीसाठी विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या गाळ्यांची अद्ययावत माहिती, थकबाकीची स्थिती आणि वसुलीची प्रगती याचा नियमित आढावा घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
तसेच मालमत्ता विभागाशी संबंधित प्रलंबित बाबींचा विभागनिहाय आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश महापौरांनी दिले. महापालिकेच्या मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन करून महसूलवाढीसाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृहनेते नरेंद्र काळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, माजी महापौर तथा नगरसेविका श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सहा आयुक्त विनोद कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक प्रशांत जाधव तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
