सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागातील कनिष्ठ श्रेणी लिपिक श्रीकांत भगवान यादव यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
भूमी व मालमत्ता विभागाकडे असलेल्या गाळ्यांच्या वसुलीबाबत यादव यांच्याकडे कामकाज सोपविण्यात आले होते. मात्र, कामकाजामध्ये अपेक्षित कार्यवाही न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे तसेच वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित कामकाज पूर्ण न केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी त्यांना तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच महापौर, स्थायी समिती सभापती व उपमहापौर यांनीही वेळोवेळी आढावा बैठका घेऊन कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीदेखील कामकाजात अपेक्षित सुधारणा न झाल्याने ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार श्रीकांत भगवान यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसून, खाजगी नोकरी अथवा व्यवसाय करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका प्रशासनातील कामकाजात शिस्त, जबाबदारी आणि वरिष्ठांच्या निर्देशांचे पालन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
