सोलापूर : हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांसह आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी झालेल्या लोकशाही बचाव अराजकता हटाव पदयात्रेत सहभाग घेतला. कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असूनही आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या नेटक्या नियोजनाचे दर्शन यावेळी घडले.
पदयात्रेपूर्वी शहर मध्य मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते आणि नागरिक सुशील रसिक सभागृह येथे एकत्र आले होते. या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांना पदयात्रेबाबत सूचना देण्याची तसेच न्याहारीची सोय करण्यात आली होती. सुशील रसिक सभागृह येथून हजारो कार्यकर्ते आणि नागरिक आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात दाखल झाले.
अग्रभागी बँजोची गाडी ठेवण्यात आली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार देवेंद्र कोठे यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. भारतमाता की जय, वंदे मातरम, लोकशाही वाचवा अराजकता हटवा अशा घोषणा देण्यात येत होत्या. तसेच ‘गली गली मे गुंजेगा और बच्चा बच्चा गायेगा, मोदी कही नही जायेगा’ अशी लोकप्रिय गाणीही लावण्यात आली होती. त्यामागे हजारो कार्यकर्ते आणि नागरिक टी-शर्ट, टोपी तसेच भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे असलेले शेले परिधान करून तसेच हाती तिरंगा भाजपचा झेंडा घेऊन चालत होते. तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या हातात विविध घोषणा लिहिलेले फलक देखील होते.
आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पदयात्रेच्या नेटक्या नियोजनाचे यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.
