सोलापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या ऐतिहासिक पर्वावर मंगळवारी सोलापूरने संघशक्तीचे विराट आणि अंगावर शहारे आणणारे दर्शन घडवले. सात नगरे व अण्णाभाऊ साठे नगरातील देगाव या एका वस्तीतून मिळून सुमारे ४ हजार स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात शिस्तबद्ध पावले टाकत काढलेल्या पथसंचलनाने अवघे शहर राष्ट्रभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून सोडले; तर शिस्त, एकजूट आणि तेजोमय भगव्या ध्वजाच्या साक्षीने सोलापूरकरांनी या देशभक्तीच्या महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेत स्वयंसेवकांवर पुष्पांचा वर्षाव केला.
पंचसूत्रीचा संदेश आणि सामाजिक बांधिलकीचा निर्धार
शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला. आगामी काळात सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीच्या माध्यमातून अविरत कर्तव्य बजावण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. “प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे कार्य करावे,” असा महत्त्वपूर्ण संदेश विविध वक्त्यांनी उत्सवातून मांडला.
देगाव येथे शहरातील पहिले वस्तीशा संचलन
संघदृष्ट्या अण्णाभाऊ साठे नगरातील देगाव गावठाण येथील मारुती मंदिर परिसरात शहरातील एकमेव ‘वस्तीशा संचलन’ पार पडले. घोषपथकाच्या तालावर झालेल्या या शिस्तबद्ध संचलनाचे देगाव ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केले.
मंगळवारी पार पडलेल्या पथसंचलनाचे प्रमुख मार्ग खालीलप्रमाणे होते:
अशोक नगर: स्वातंत्र्यसैनिक चौक (सकाळी ७ वा.)
केशव नगर: ई-ग्रुप परमेश्वरी देवी मंदिर (सकाळी ७ वा.)
संभाजी नगर: जगदंबा चौक (सकाळी ९ वा.)
हनुमान नगर: श्री समर्थ भैरव देवस्थान (सकाळी ७ वा.)
रेवणसिद्धेश्वर नगर: छत्रपती संभाजी महाराज तलाव (सकाळी ७ वा.)
दयानंद नगर: ५१ फुटी हनुमान मूर्ती (सकाळी ७:१५ वा.)
विक्रमादित्य नगर: मन्मथस्वामी मंदिर (सकाळी ७ वा.)
देगाव वस्ती (अण्णाभाऊ साठे नगर): गावठाण मारुती मंदिर (सकाळी ९ वा.)
मध्यभागी चार ध्वजरक्षक स्वयंसेवकांसह परम पवित्र भगवा ध्वज आणि त्याच्या पाठीमागे घोष पथक या दोन्हींच्या पुढे व पाठीमागे शिस्तीत चालणाऱ्या स्वयंसेवकांच्या तुकड्या, असे या संचलनाचे विहंगम दृश्य होते. या यशस्वी आयोजनामुळे संपूर्ण सोलापूर शहरात देशभक्तीमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
