सोलापूर – उत्तर कसबा, भोगडे गल्ली येथील श्री कसबा देवी देवस्थान नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने यंदाचा नवरात्रोत्सव ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवादरम्यान देवीची दररोज विविध रूपांमध्ये पूजा करण्यात येणार असून, कुंकूमार्चन, आरती, भजन, महिलांचा ओटीभरण कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धेश्वर भोगडे यांनी दिली.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ११ ऑक्टोबर रोजी देवीची शस्त्रपूजा करण्यात येणार आहे. १२ रोजी सप्तशृंगी माता, १३ रोजी शेरोवली माता, १४ रोजी गौरी नंदन गणेश, १५ रोजी तुळजापूर माता शेषनाग, १६ रोजी विठ्ठल-रुक्मिणी, १७ रोजी त्रिपुरासुंदरी आणि १८ ऑक्टोबर रोजी सरस्वती माता अवतारात देवीची पूजा करण्यात येणार आहे. १९ रोजी महाकाली अवताराची पूजा होणार असून, २० ऑक्टोबर रोजी विशेष अलंकार पूजा करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज सायंकाळी ५ वाजता भजन कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महिलांसाठी ओटीभरणाचा कार्यक्रमही होणार असून, भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व केळीचा महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कसबा देवी देवस्थान नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस सुनील मसरे, रवी कोरे, सचिन म्हेत्रे,
जितेंद्र महामुनी, राहुल भोगडे, महेश मैंदर्गीकर, योगेश भोगडे, यश महाजन आदी उपस्थित होते.
